साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
सुमारे १,१०० विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत व भगवे ध्वज हातात घेऊन विठ्ठल नामाच्या गजरात पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारी भव्य दिंडी काढली. यावेळी जेएनपीएचे अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिंगण सोहळा, भजन, महाआरती आणि अभंग गायनाने कार्यक्रमाला भक्तिरसाची रंगत आली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवावे, तसेच शैक्षणिक गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी शाळेच्या इतिहासातील हा पहिलाच इतका भव्य दिंडी सोहळा असल्याचे सांगत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गुणवत्तापूर्ण निकालाचा गौरव केला.