‘संविधानाचा विजय, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश’; महाडात राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जल्लोष

रायगड | नरेश पाटील
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या लोकशाही संघर्षाला मिळालेल्या यशाचा आणि भारतीय संविधानाच्या विजयाचा उत्सव रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. २६ जुलै) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाला अभिवादन करण्यात आले, तर विद्यार्थ्यांच्या न्याय्य संघर्षाला यश मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत, लोकशाही आणि घटनात्मक अधिकार बहाल करणारे भारतीय संविधान हेच अन्यायाविरुद्ध लढण्याचे सर्वात मोठे बळ असल्याचे त्यांनी सांगितले.
 ठाकूर म्हणाले की, भारतीय संविधानामुळेच नागरिकांच्या हक्कांचे आणि सन्मानाचे संरक्षण झाले असून अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा अधिकार प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, त्यांचा छळ करण्यात आला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या प्रेरणादायी संदेशातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी एकजुटीने आपला लढा सुरू ठेवला आणि न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला.
ठाकुर यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा विद्यार्थी, नागरिक आणि विरोधी पक्षांनी घटनात्मक मार्गाने उभारलेल्या सातत्यपूर्ण लोकशाही संघर्षाचा परिणाम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संविधानामुळेच अशा लोकशाही आंदोलनांना घटनात्मक संरक्षण मिळाले. त्यामुळे आजचा दिवस हा केवळ एका राजकीय घडामोडीचा नसून भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य संघर्षाच्या विजयाचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे”, “भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या एकजुटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही या संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शांततामय लोकशाही आंदोलनांना कायम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.