समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर नागरिकांना आपली मते मांडता येणार आहेत.
ही सुनावणी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. २१ नोव्हेंबरला मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग, तर २२ नोव्हेंबरला ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
विवाह, घटस्फोट, लिव्ह-इन संबंध, भरणपोषण, पालकत्व आणि वारसाहक्क यांसारख्या विषयांवर नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. इच्छुकांनी निर्धारित वेळेच्या एक तास आधी विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. ऑनलाइन मते मांडण्यासाठी www.ucc.maharashtra.gov.in या पोर्टलवरही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.