महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के! जळगाव, अकोला, मलकापूर हादरले; नागरिकांमध्ये भीती

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील विविध भागांत आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल आणि मुक्ताईनगरसह अकोला व मलकापूर परिसरात जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली, तर काही ठिकाणी घरातील साहित्यही हलल्याचे समोर आले. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. खरगोनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहितीही समोर आली आहे. या धक्क्यांमुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अकोल्यातील भूकंपाबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.