महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात वाढ

Another blow from inflation
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
 महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता सीएनजी दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ केली असून, 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. याचा फटका रिक्षा, टॅक्सी चालकांसह खासगी वाहनधारकांनाही बसणार आहे.
महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचा नवा दर 91.50 रुपये प्रति किलो झाला आहे. पश्चिम आशियातील तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमतीतील वाढ आणि देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील कपात यामुळे आयात गॅसवरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी खरेदी खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुणे, नाशिक जिल्ह्यांतही सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी 99 रुपये, तर पीएनजी 53 रुपये प्रति घनमीटर झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजीचा दर 99.75 रुपये, तर पीएनजीचा दर 51.75 रुपये प्रति घनमीटर आहे.
या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या खर्चात वाढ होणार असून, प्रवासी भाडेवाढीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणितावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.