सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार न्याय? आयुक्त अभिषेक कृष्णा यांचा दिरंगाई करणाऱ्या प्रशासनावर कारवाईचा इशारा

उरण | विठ्ठल ममताबादे 
 सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळावी या मागणीसंदर्भात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून नगरपालिका प्रशासन संचालनालय येथे आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची माजी मंत्री प्रवीण प्रतापराव भोसले, रविंद्र प्रतापराव भोसले, कामगार नेते संतोष पवार आदींनी प्रत्यक्ष भेट घेतली. बैठकीस उपायुक्त रमाकांत गोसावी, मनोहर पाटील तसेच सुनील परब, गोपाळ सावंत, नितिन कदम यांसह सफाई कामगारांचे वारस उपस्थित होते.
बैठकीदरम्यान राज्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयांवर सविस्तर चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, संचालनालयाचे निर्देश आणि संबंधित परिपत्रकांचे गांभीर्याने पालन न केल्यामुळे काही ठिकाणी विनाकारण दिरंगाई होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.
चर्चेनंतर आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये शासन निर्णयांचे पालन न करता वारसांना नोकरी देण्यात टाळाटाळ केली जात आहे, त्या ठिकाणच्या आस्थापना प्रमुखांवर नियमोचित कारवाई करण्याचे संकेत दिले. या निर्णयामुळे राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांना न्याय मिळण्याची आशा बळावली असून सकारात्मक भूमिकेबद्दल माजी मंत्री प्रवीण प्रतापराव भोसले व उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.