वर्षभर राबणाऱ्या अवजारांना एका दिवसाची विश्रांती; विश्वकर्मा पूजेतून कृतज्ञता

रायगड | अमुलकुमार जैन
दिवसभर हातात असलेली हत्यारे, वर्षभर धावणारी वाहने आणि सतत काम करणाऱ्या यंत्रसामग्रीला वर्षातून एक दिवस विश्रांती देत त्यांची पूजा करण्याची परंपरा अलिबागमध्ये विश्वकर्मा पूजेनिमित्त जपण्यात आली. निर्माणकला आणि तंत्रकौशल्याचे दैवत मानल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनिमित्त गुरुवारी अलिबागसह रायगड जिल्ह्यातील गॅरेज, वर्कशॉप, कारखाने, सॉ मिल, बांधकाम व्यवसाय तसेच नौका बांधणी व दुरुस्ती केंद्रांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सकाळपासूनच विविध कामाच्या ठिकाणी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर यंत्रे, वाहने, लोखंडी अवजारे आणि कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची स्वच्छता करून विधिवत पूजन करण्यात आले. रोजच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या साधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही या पूजेकडे पाहिले जाते.
अलिबागच्या किनारपट्टी भागातील बोट यार्डमध्ये या उत्सवाचे विशेष स्वरूप पाहायला मिळाले. मच्छीमार बांधव, नौका बांधणीतील कारागीर आणि मेकॅनिक यांनी एकत्र येत विश्वकर्मा पूजन केले. समुद्रात नौका सुरक्षित राहाव्यात, व्यवसायात अडथळे येऊ नयेत आणि वर्षभर रोजगार मिळावा, यासाठी भगवान विश्वकर्मा यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
गॅरेज आणि वर्कशॉपमध्येही वाहने व यंत्रसामग्रीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी भजन आणि पारंपरिक लोकगीतांच्या कार्यक्रमांनी उत्सवाला सांस्कृतिक रंग मिळाला.
रायगडच्या बांधकाम आणि कारागिरीच्या परंपरेशी विश्वकर्मा पूजेचे नाते जोडलेले आहे. किल्ले, मंदिरे, पारंपरिक घरे आणि नौका बांधणीमध्ये कुशल कारागिरांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे केवळ धार्मिक विधी न राहता कारागिरी, श्रम आणि तंत्रकौशल्याचा सन्मान करणारा उत्सव म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.
विश्वकर्मा उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकर शर्मा यांनी सांगितले की, “कामगारांच्या हातातील अवजारे आणि यंत्रे हीच त्यांच्या उदरनिर्वाहाची साधने आहेत. वर्षभर मेहनत करणाऱ्या या साधनांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा विश्वकर्मा पूजेतून जपली जाते.