माणगांवात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीची जय्यत तयारी

माणगांव  | नरेश पाटील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत माणगाव नगरपंचायतीने गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता, रंगरंगोटी तसेच आवश्यक प्रकाशयोजनेसह विविध सुविधांची तयारी पूर्ण केली आहे. उद्या, शनिवार, १९ रोजी होणाऱ्या पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी माणगांव नगरपंचायत सज्ज झाली असून गणेशभक्तांना सुरक्षित, स्वच्छ व सुव्यवस्थित वातावरणात गणरायाला निरोप देता यावा, यासाठी नगरपंचायतीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
नगरपंचायत नगराध्यक्ष,उपाध्यक्ष, सभापती,नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे विसर्जन घाटाची स्वच्छता करण्यात आली असून घाट परिसरात पेंटिंग व रंगरंगोटी करून परिसराला सुशोभित करण्यात आले आहे. रात्रीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशयोजनेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव यांच्या देखरेखीखाली निर्माल्य संकलनासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नदी, तलाव व जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून गणेशभक्तांनी या पर्यावरणपूरक सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन काळात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांचा समतोल राखण्यावर नगरपंचायतीचा भर आहे. ‘भक्तीबरोबर पर्यावरणाचीही जबाबदारी’ या भावनेतून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता उपलब्ध कृत्रिम विसर्जन व निर्माल्य संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी व देखरेख सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून प्रमोद मोरे यांची यावेळी उपस्थिती होती. माणगाव नगरपंचायतीच्या या नियोजनामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यास हातभार लागणार आहे.
गणेशभक्तांनी नगरपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा आणि निर्माल्य संकलन केंद्रांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. सामूहिक सहभागातूनच भक्तीचा उत्सव पर्यावरणपूरक आणि आदर्श पद्धतीने साजरा होऊ शकतो.