अलिबाग-वडखळ रस्त्याची दुर्दशा : सत्ताधारी व प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष; जीव गेल्यावरच खड्डे बुजवणार का ? प्रवाश्यांचा संतप्त सवाल 

अलिबाग-वडखळ रस्त्याची दुर्दशा
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
वडखळ-अलिबाग हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा व गजबजलेला रस्ता असून त्याची अवस्था आज दयनीयतेच्या कडेलोटाला पोहोचली आहे. सत्ताधारी पक्षातील माजी व आजी आमदारांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना व पर्यटकांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. सत्ता असूनही आणि स्वतःच्या दारासमोरील भलेमोठे खड्डे सुद्धा भरले न गेल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे.
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून दर शनिवार-रविवारी हजारो पर्यटक अलिबाग, मुरुड, नागाव, किहीम अशा बीचेसवर येतात. यामुळे स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी मिळतात; मात्र आज रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली आहे की रस्ता शोधणे कठीण झाले आहे. “लोकांचे जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का?” असा संतप्त सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
पोयनाड बाजारपेठेची ऐतिहासिक परंपरा आणि परिसरातील पाली, पेण, अलिबाग, मुरुड तालुक्यातील नागरिकांची या रस्त्यावरून सततची ये-जा असूनही रस्त्याचा दर्जा सुधारण्यात आलेले अपयश प्रशासनाचे की स्थानिक राजकारण्यांचे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मतदान आले की हे राजकारणी दारोदारी फिरतात, मग नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्र का येत नाहीत, असा घणाघाती सूर समाजातून उमटतो आहे.
सध्या पावसाळ्यामुळे खड्डे पडलेत, हे मान्य आहे; पण किमान तातडीने भरण्याची जबाबदारी प्रशासनाने तरी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गणेशोत्सव संपून नवरात्र व दिवाळी सारखे सण समोर उभे असताना पर्यटकांची व नागरिकांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करणे ही तातडीची गरज आहे. “फक्त लोकांचे जीव गेल्यावरच जाग येणार का?” असा थेट सवाल आता नागरिक प्रशासनाला करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *