रेवदंडा येथील तरुणी सिद्धी दिलीप काटवी बेपत्ता झाल्यापासून तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला असूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी विविध दिशांनी शोधमोहीम राबवली असली, तरी ठोस प्रगती झालेली नाही. मोबाईल लोकेशन, कॉल-डिटेल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजचा सखोल तपास करण्यात आला आहे. राजस्थानपर्यंत काही माहिती मिळाल्याचे संकेत मिळाले होते, मात्र त्यातून कोणताही ठोस धागा सापडलेला नाही, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
सिद्धीच्या बेपत्ता प्रकरणाने रेवदंडा परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढा काळ उलटूनही निष्कर्ष न लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिद्धीच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाकडे तपास अधिक गतीमान करण्याची मागणी केली असून, सर्वच जण तिच्या सुखरूप परतीची अपेक्षा करत आहेत.
गावकऱ्यांमध्ये अजूनही आशेचा किरण जिवंत आहे, सिद्धी कुठेतरी असेल आणि परत येईल, या विश्वासानेच तिचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ वाट पाहत आहेत. दरम्यान, कोणालाही सिद्धी दिलीप काटवीबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.