माथेरानला दिशा देण्याचे काम शिवराष्ट्र पॅनेल करू शकते – प्रसाद सावंत

Matheran sawant
माथेरान | मुकुंद रांजणे 
शंभरापैकी ९९  चांगली कामे मार्गी लावली आणि एखादे काम काही कारणास्तव राहिल्यास केलेल्या चांगल्या कामांची वाहवा न करता एका कामाची चूक निदर्शनास आणून देण्यासाठी विरोधकांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.ज्यांना आजवर सत्तेत सहभागी होता आले नाही याचे सिंहावलोकन करण्याऐवजी कार्यक्षम लोकप्रतिनिधीची उणिधुनी काढण्यात अनेकांना आनंद मिळत असतो.
नव्याने राजकीय क्षेत्रात पदार्पण करून आम्ही २०१६ मध्ये त्यावेळेस एकहाती सत्ता स्थापन केली होती याचे कोडे अद्यापही विरोधकांना कदाचित सुटले नसावे. केवळ एखाद्यावर आरोप प्रत्यारोप केल्यावर लोक शाबासकी देतील आपले गुणगान गातील या अविर्भावात काही स्वार्थी मंडळी नेहमीच चांगल्या कामांना विरोध करत आले आहेत याची माहिती सर्व माथेरान करांना ठाऊक आहे.आम्ही धनाचे पुजारी नसून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी धडपड करणारे कार्यकर्ते आहोत.राजकीय क्षेत्रात कुणीही धुतल्या तांदळासारखा नाही.हे त्रिवार सत्य आहे. राजकारण हा आमचा मुळात व्यवसाय नसून जनतेच्या समस्या त्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो.जेव्हा दोन बंधूंना एकत्र लढविले जाते आणि एखाद्या सुसंस्कृत कुटुंबाची मजा पाहण्यात काहींना धन्यता वाटते आणि राजकारणामुळे मतभिन्नता वाढलेले कुटुंब ज्यावेळी पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने एकत्रित राहू पाहते त्यावेळी सुध्दा विरोधकांना पोटसुळ उठते.
आम्ही दोघेही बंधू भावी नगराध्यक्ष अजय सावंत आणि मी स्वतः माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी गावाच्या हिताची, युवा पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या परीने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु इथल्या नतद्रष्ट मंडळींना आम्ही केलेली विकासकामे नजरेत खुपु लागली आणि प्रत्येक महत्वपूर्ण कामाला खोडा घालण्यासाठी यांचा खटाटोप सुरू झाला होता. आम्ही कुणावरही नुसते आरोप करत नसून पुढील काळात सुध्दा  आमच्या कामातून उत्तरे देऊ.ज्या लोकांना मागील काळात मतदारांनी विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या सोपावल्या होत्या.त्यांना पाच वर्षे सत्ता चालवता आली नाही. सन्मानीय माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीपसेठ गुप्ता यांच्यामुळे ही मंडळी महत्वाच्या पदावर विराजमान झाली होती. त्याच दिलीप गुप्तांना सुध्दा केवळ खुर्चीच्या मोहापायी धोका दिल्याने अखेरीस जुन्या म्हणीनुसार आजवरच्या काळात यांचे “तेलही गेले आणि तूपही गेले”अशीच काहीशी अवस्था झाली आहे. सर्वसामान्य लोकांना आम्ही सुध्दा अनेकदा सर्वतोपरी सहकार्य मदत केली आहे परंतु आम्ही एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू दिली नाही हेच आमच्यावर झालेले वडिलोपार्जित संस्कार आहेत आणि याच संस्काराच्या शिदोरीवर आम्ही राजकारण करतोच परंतु अगोदर समाजकारणाला अधिकाधिक प्राधान्य देत आहोत.
आजही मला माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि भावी नगराध्यक्ष अजय सावंत असो किंवा माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी असोत यांनी माझ्या मागील कामाचा लेखाजोखा पाहून प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी जाहीर केली ही माझ्या कामाची पोहोचपावती आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी आमची आघाडी आगामी निवडणुकीला सामोरे जात आहोत. अद्यापही आमच्याकडे या गावाला कशाप्रकारे विकासाकडे नेता येईल हा दुरदृष्टिकोन आहे. फक्त ठेके मिळविण्यासाठी आम्ही सत्तेत विराजमान होणार नसून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, तळागाळातील लोकांना उद्भवणाऱ्या समस्या लवकरात लवकर कशा पद्धतीने सुटू शकतात यासाठी  आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.तरुण पिढीला त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक वर्षे आम्ही स्वखर्चाने सुध्दा नाईट क्रिकेट सामने आयोजित केले आहेत यापुढेही चालू ठेवणार आहोत.
आमच्या कामांची पद्धत तरुण वर्गाला माहीत आहे. आजही आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबतच आहेत. काहींना बळजबरीने सुध्दा आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत पण आमचे कार्यकर्ते आजही माझ्या सोबत आहेत आणि त्यांनीच स्वतः मला फोनवरून सांगितले होते की आपल्या प्रभागात फक्त प्रसादभाईच हवेत त्यामुळे त्यांच्या या आग्रहास्तव,आपलेपणामुळे मी प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. माझा विजय हा निश्चित आहेच यात दुमत नाही. मी कोणत्याही परिस्थितीत सभागृहात जाऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. परंतु ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आमचे संपूर्ण शिवराष्ट्र पॅनेल नगरपरिषदेच्या सभागृहात लवकरच विराजमान होणार आहे आणि याचे साक्षीदार होण्यासाठी विरोधकांनी सुद्धा  आवर्जून उपस्थित राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *