महाड येथे ‘ग्रंथोत्सव 2026’ चं आयोजन; वाचन संस्कृतीला चालना देणारा भव्य ज्ञानोत्सव

महाड | मिलिंद माने 
ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय रायगड–अलिबाग यांच्या वतीने ‘ग्रंथोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.
महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 मार्च 2026 रोजी हा ज्ञानोत्सव रंगणार असून दोन दिवस विविध साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवार, 12 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपविभागीय अधिकारी पोपटराव ओमासे आणि उपनगराध्यक्ष संदिप जाधव यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता मुख्य उद्घाटन समारंभ होईल. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, धैर्यशील पाटील तसेच विविध आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. विलास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक सत्र, उत्कृष्ट वाचकांचा सन्मान आणि डॉ. विष्णू सुरासे यांचा ‘तणावमुक्त आनंदी जीवनाचा मूलमंत्र’ हा विनोदी साहित्य वाचनाचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार, 13 मार्च रोजी दुसऱ्या दिवशी जि. प. शाळा आसणपोईच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादर होईल. त्यानंतर ‘वाचन संस्कृतीचे पाईक – सार्वजनिक ग्रंथालये’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी प्रा. यशवंत गोसावी यांचे ‘कुशल प्रशासक – लोकमाता अहिल्याबाई होळकर’ या विषयावर व्याख्यान होणार असून चारुदत्त चिखले यांच्या ‘ही माती माझ्या यात्रेची विठाई’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. यानंतर भव्य काव्यवाचन सोहळा पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथांचे प्रदर्शन व विक्रीही होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रायगड ग्रंथोत्सव समितीने केले आहे.