महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेला रायगड जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत १४ ते १५ वयोगटातील मुलींना संरक्षणात्मक लस देण्यात येणार असून पालकांनी पुढे येऊन मुलींना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी विविध विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लसीकरण सत्रांचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ, शीतसाखळी व्यवस्था तसेच जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. ह्यूमन पॅपिलोमा विषाणू हा या कर्करोगाचा प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. योग्य वेळी एचपीव्ही लस घेतल्यास या आजारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींचे लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जात आहे. या मोहिमेमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींनाही संरक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.
लसीकरणानंतर मुलींनी किमान ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काही वेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे साधारण दोन ते तीन दिवसांत कमी होतात, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व पालक आणि नागरिकांनी आपल्या १४ ते १५ वयोगटातील मुलींना या लसीकरणाचा लाभ द्यावा आणि गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी या महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्राची नेहुळकर यांनी केले आहे.
नोंदणीची सुविधा : १४ ते १५ वयोगटातील मुलींना या मोहिमेत लस दिली जाणार आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत लसीकरण सुरू आहे. पालकांना U-WIN Portal वर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.