लाल रंगाच्या थार जीपवर बनावट नंबर प्लेट लावून विनयभंग तसेच अपघात केल्याप्रकरणी आरोपीचा गुन्हे शाखा, कक्ष-३ पनवेलच्या पथकाने अवघ्या १० तासांत शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, आरटीओच्या नोंदी आणि विविध ठिकाणच्या कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत वाहनाचा खरा क्रमांकही शोधून काढला.
खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान सीसीटीव्हीमध्ये थारचा क्रमांक MH 43 AR 6335 दिसून आला. मात्र, पडताळणीत हा क्रमांक मारुती वॅगन-आरचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाल रंगाच्या नोंदणीकृत ६२ थार वाहनांची आरटीओ नोंद तपासण्यात आली. त्यातून संबंधित थारचा मूळ क्रमांक MH 20 FU 3751 असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी बोनकोडे गाव, कोपरखैरणे येथे आरोपी अली उर्फ तालिब अहसन नखवी (वय ३०) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही नेरुळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
या कारवाईनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला खारघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणात खारघर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत आणखी एक गुन्हा उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.