खालापूरची लेक, पोलादपूर माजी जिल्हा परिषद सदस्याच्या सुनेचा गळफास; आत्महत्या की मृत्यूमागे आणखी काही?

नागोठण्यात 23 वर्षीय पुजाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील कोतवाल बुद्रुक गावातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या सुनेने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावल्याची घटना तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद रात्री उशिरा दाखल केली आहे.
कोतवाल बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांच्या घरी मुलगा घराबाहेर गेला असताना सुनबाई गार्गी गणेश दरेकर (वय 24 पूर्वाश्रमीची नेहा सदाशिव दळवी) उशिरापर्यंत न उठल्याने त्यांच्या रुमच्या दुसऱ्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडले असता तिने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतला असल्याचे दिसून आले.  या घटनेनंतर पोलादपूर तालुक्यातील सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन चर्चा सुरू झाली. 
मृत विवाहित महिलेच्या माहेरी खालापूर तालुक्यातील खांबेवाडी अंतर्गत गोळेवाडी येथील नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे धाव घेऊन भावनातिरेकाने आक्रोश केला. यावेळी महिलेचा भाऊ प्रथमेश शिवाजी दळवी (वय 28) याने बहिणीचा मृतदेह पाहून पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
या घटनेनंतर महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी सायंकाळी भेट देऊन पाहाणी केली. यावेळी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. जगदाळे यांनी शवविच्छेदन करून मृत्यूबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले. 
पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणीनंतर तपासकार्य सुरू केले. रात्री उशिरा कोतवाल बुद्रुक येथे मृतदेहावर माहेरच्या व सासरच्या तसेच ग्रामस्थ आणि आप्तपरिवार समाजबांधवांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल सुरू असलेल्या चर्चेमुळे आत्महत्या अथवा आणखी काही घटना मृत्यूस कारणीभूत आहे याबाबत निश्चिती झाली नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 15-2026 नुसार नोंद करण्यात आली आहे.