खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक फाटा येथे प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य गुटख्याचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी तीन आरोपींना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता मौजे श्री पान शॉप, चौक फाटा, चौक, ता. खालापूर येथे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही संबंधित पदार्थांचा साठा करून विक्री केली जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे गुरनं. 428/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223, 274, 275, 123 तसेच कलम 3(5) आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व विनियम 2011 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि शिंगटे करीत आहेत.