दिवेआगरच्या समुद्रकिनारी काळीज पिळवटून टाकणारी घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू !

बोर्ली पंचतन | मकरंद जाधव
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या आळंदी, पुणे येथील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १) घडली. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून आळंदीमध्येही शोककळा पसरली आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या (११वी आणि १२वी ) कोचिंग क्लासमधील विद्यार्थी आणि शिक्षक पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. या सहलीमध्ये २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षक असे एकूण ४८ जण सहभागी झाले होते.
दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत असताना काही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यावेळी समुद्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.
घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावर उपस्थित स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्याचबरोबर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम राबविण्यात आली.
बचावकार्यात सर्व आठ विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
  • यश किरण वानखेडे (वय १६), आळंदी
  • सोहम तुकाराम भांडवलकर
  • तन्मय दत्तात्रय वाहिले
  • कौस्तुभ संदीप दौंड
  • कैवल्य सतीश वासनकर
  • राजवीर युवराज वहिले
  • प्रणव रामदास बनसोडे
  • सुमित भारत अहिरे
हे सर्व विद्यार्थी विनर्स अकॅडमीच्या इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतील असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. एकाच सहलीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याने दिवेआगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी समुद्रात उतरण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीची माहिती घ्यावी, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज घ्यावा आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.