पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सडवली फाट्यासमोरील काळकाई हॉटेलच्या मागच्या बाजूला जोगळे लॉजमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुक्कामी आलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावातील वाहतूक पोलीसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
पुणे -बंगळुरू महामार्गावरील भुईंज गावातील वाहतूक पोलीस संतोष रामचंद्र नलावडे हा काही घरगुती कारणावरून 30 सप्टेंबरला पोलादपूर तालुक्यातील काळकाई हॉटेलच्या मागील भागात असलेल्या जोगळे लॉजमध्ये मुक्कामी आला होता. शुक्रवारी दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी त्याला आंघोळीसाठी पाणी देण्यासाठी गेलेल्या जोगळे लॉजमधील कर्मचाऱ्याला रुम नंबर चारचा दरवाजा आतून बंद केलेला जाणवल्यावर त्याने हाका मारल्या व दरवाजा लगतच्या खिडकीची काच सरकावून खोलीत डोकावले. यावेळी सिलींग फॅनला दोरीने गळफास लावून तो मृतावस्थेत उभा असल्याचे दिसून आले.
यावेळी तातडीने पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सतीश पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून मृताच्या नातेवाईकांना फोन करून कळवले. नातेवाईक पोहोचल्यानंतर रुम नंबर चारचा दरवाजा उघडून प्रेत खाली उतरविण्यात आले. यावेळी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर उत्तरिय तपासणी आणि शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.