नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या नशा मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ७२६ किलो अंमली पदार्थ, ज्याची किंमत २६ कोटी ३० लाख रुपये आहे, कायदेशीर प्रक्रियेनंतर तळोजा येथे नष्ट करण्यात आले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण आणि समन्वयित कारवाई सुरू ठेवली आहे. आज, ३० सप्टेंबर २०२६ रोजी शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७२६ किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या अंमली पदार्थांची एकूण किंमत २६ कोटी ३० लाख रुपये आहे. यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी १९२ गुन्ह्यांमधील १ अब्ज १३ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते.
अंमली पदार्थांविरोधातील कारवाईसोबतच नवी मुंबई पोलिसांकडून जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. ‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘Campus Connect’ कार्यक्रम राबविण्यात आला असून, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. अंमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी ८८२८-११२-११२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून, माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भविष्यातही अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र आणि समन्वयित पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.