अलिबाग-मुरुडमध्ये शिवसेनेचे रणशिंग; SIR ते सदस्य नोंदणीपर्यंत धडाका, निवडणुकीसाठी ‘मिशन मोड’ तयारी!

रायगड | अमुलकुमार जैन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. पक्षाच्या मतदारसंघ आढावा बैठकीत SIR प्रक्रिया, BLO नियुक्त्या, सदस्य नोंदणी आणि तळागाळातील संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. संपर्कप्रमुख संजय कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, मुरुड तालुका प्रमुख नवशाद दळवी, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, प्रवक्ते धनंजय गुरव, शहरप्रमुख व नगरसेवक संदीप पालकर, विधानसभा संघटक कृष्णा कडवे यांच्यासह विविध विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघात SIR प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या BLO नियुक्त्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सदस्य नोंदणीचे फॉर्म कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख करताना, “तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आमदार निवडून दिला; मात्र त्यांनी गद्दारी केली. तरीही शिवसैनिक खचलेला नाही. कडवट कार्यकर्ते पक्षासोबत ठामपणे उभे आहेत,” असे सांगितले. आगामी काळात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
संपर्कप्रमुख संजय कदम यांनी पक्षनिष्ठेचा उल्लेख करताना, “मला अनेक पदे मिळाली, मात्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले ‘शिवसैनिक’ हे पद माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. हे पद कोणीही काढून घेऊ शकत नाही,” असे सांगितले. आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
SIR फॉर्म आणि सदस्य नोंदणी ही कार्यकर्त्यांची महत्त्वाची जबाबदारी असून प्रत्येकाने ती गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन कदम यांनी केले. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व नेते लवकरच प्रत्यक्ष दौरे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांचाही बैठकीत उल्लेख करण्यात आला.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रलंबित पदनियुक्त्या पूर्ण करण्यावरही चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम, प्रतिमा वाटप आणि नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, १५ डिसेंबरपासून पाच दिवसांचे डे-नाईट क्रिकेट सामने आयोजित करण्यात येणार असून विजेत्या संघाला ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत सोमवारी झूम बैठकीद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
श्रीवर्धन मतदारसंघात एका वर्षात ३२ हजार मतांची वाढ झाल्याचा दावा करत, अलिबागमध्येही पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुरुडमध्ये ठाकरे गटाने संघटनात्मक तयारीला वेग दिल्याचे चित्र बैठकीतून दिसून आले.