छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्यासोबत केल्याप्रकरणी राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला जात असताना पोलादपूर भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे यांच्या नेतृत्वाखाली सपकाळ यांची चित्रं जाळून छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोरे निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष तनुजा भागवत यादेखील निषेधकर्त्यांत सामील होत्या.
दोन दिवसांपूर्वी टीपू सुलतान याला शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले होते. टीपू सुलतान यांनी छत्रपतींचा आदर्श ठेवून इंग्रजांविरूध्द लढण्याची भूमिका घेतल्याचे यावेळी सपकाळ यांनी सांगितले होते. यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्षेप घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला. यानंतर राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात निषेधाची तीव्रता वाढविणाऱ्या आंदोलनांची मालिका सुरू झाली. याचअनुषंगाने, पोलादपूर तालुका भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोर तालुकाअध्यक्ष वैभव चांदे, राजेश सकपाळ, महेश निकम, प्रमोद चव्हाण, आशुतोष दरेकर, सपना बुटाला, गणेश शेठ, मनोज पवार आणि संचिता चांदे यांनी भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष तनुजा भागवत यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन त्यांची छायाचित्रे जाळली.
पोलादपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाने काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा मिळविल्याचे विविध प्रचारबैठकीवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळाराम मोरे यांच्या उपस्थितीमुळे स्पष्ट झाले होते. भाजपच्या या आंदोलनाप्रसंगी निवडणुकीपूर्वीचीच नेते व पदाधिकारी मंडळी उपस्थित होती. नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी पक्षात सामील झालेल्या उमेदवार नेत्यांचा समावेश नव्हता, ही बाब प्रकर्षाने पोलादपूरकरांना जाणवली.