तालुका तळा, जिल्हा रायगड येथील मुक्काम बारपे, पोस्ट महागाव येथील ग्रामस्थांनी गावाच्या परिसरात प्रस्तावित खडी (स्टोन क्रशर) मशीन प्रकल्पाविरोधात एकमुखी भूमिका घेत तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर प्रकल्पामुळे पर्यावरण, आरोग्य व पाणी स्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या मते, संबंधित प्रकल्प सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात धूळ व हवा प्रदूषण निर्माण होईल. गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गट क्रमांक ८८ येथे संबंधित जागेवर उत्खनन व क्रशर प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सुरुंगाद्वारे उत्खनन झाल्यास भूजल पातळी खालावण्याची तसेच विहिरी व अंतर्गत पाण्याचे झरे आटण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे शेती, झाडे-झुडपे, पशु-पक्षी व पर्यावरणावर परिणाम होऊन मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. विशेषतः श्वसनाचे, डोळ्यांचे व त्वचेचे आजार वाढण्याची शक्यता असून मोठ्या वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघातांचा धोका निर्माण होईल, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
दिनांक १४/०२/२०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री हनुमान मंदिर येथे संयुक्त ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत सविस्तर चर्चा करून संबंधित प्रकल्पास सर्वानुमते विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम २६८ व २९० (सार्वजनिक उपद्रव), कलम २७७ (पाणी प्रदूषण), कलम २७८ (वातावरण प्रदूषण) व कलम ३३६ (मानवी जीवनास धोका) यांचा उल्लेख करत कायदेशीर बाबी अधोरेखित केल्या. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ व पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ यांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी स्थानिक प्रशासन, उपविभागीय अधिकारी माणगाव, तळा पोलीस ठाणे तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले असून प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा ठाम इशारा आहे की, गावाच्या आरोग्य, पर्यावरण व भविष्यास धोका पोहोचविणारा कोणताही प्रकल्प सहन केला जाणार नाही.