पोलादपूरमध्ये विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा; पतीला अटक

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सुन गार्गी गणेश दरेकर हिचा गळफास लावून मृत्यू झाल्याप्रकरणी तिला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचा पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तिचा पती गणेश मुरलीधर दरेकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलीसांनी अटक करुन महाड न्यायालयात हजर केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कोतवाल बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांच्या घरी मुलगा घराबाहेर गेला असताना सुनबाई गार्गी गणेश दरेकर (वय २३, पूर्वाश्रमीची नेहा सदाशिव दळवी) हिने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. यावेळी मृत विवाहित महिलेचा भाऊ खालापूर तालुक्यातील खांबेवाडी अंतर्गत गोळेवाडी येथील प्रथमेश शिवाजी दळवी (वय २८) याने बहिणीचा मृतदेह पाहून पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी कोतवाल बुद्रुक येथील मयत गार्गी गणेश दरेकर हिला आरोपी पती गणेश मुरलीधर दरेकर (वय३३), मुरलीधर दरेकर (वय ६७), मनिषा दरेकर (वय ६०), मुन्नी पार्टे (वय२८) श्रीकांत पार्टे (वय ५२) यांनी शारीरीक, मानसिक तसेच वेळोवेळी पैशाची मागणी करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याबाबत मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर १५-२०२६ मध्ये दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्याद दिली. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश मुरलीधर दरेकर यांस दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली.
याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.१०८/२०२६, भा.न्या.सं.२०२३ चे कलमाप्रमाणे ८०, ८५ १०८, ३(५) प्रमाणे भा.दं.वि. कलम ३०६, ३०४(२), ४९८(१), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे हे करीत आहेत.
ताराराणी ब्रिगेड अध्यक्षा वंदनाताई मोरे यांचा मृत विवाहितेच्या नातेवाईकांसाठी पाठपुरावा
कोतवाल बुद्रुक येथील गार्गी गणेश दरेकर (वय २३, पूर्वाश्रमीची नेहा सदाशिव दळवी) हिने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मृत विवाहित महिलेचा खालापूर तालुक्यातील खांबेवाडी अंतर्गत गोळेवाडी येथील भाऊ प्रथमेश शिवाजी दळवी (वय २८) याने पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे यांना भेटून मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी कैफियत सांगितली आणि निवेदन दिले.
मृत विवाहितेच्या नातेवाईकांच्यावतीने याप्रकरणी पाठपुरावा करण्यासाठी वंदनाताई मोरे यांनी ताराराणी ब्रिगेडच्या उपाध्यक्षा कविता खोपकर तसेच कार्यकर्ते यांनी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यानंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांना नातेवाईकांनी दिलेले निवेदन सादर केले. यानंतर मृत विवाहितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पाठपुरावा यशस्वी झाला असल्याबद्दल नातेवाईकांचे म्हणणे आहे.