पाली बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट; पेण-दादर येथील इसम जेरबंद

रायगड | अमुलकुमार जैन
पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाऱ्या इसमाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यवहार करताना नोटांची तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाली बाजारपेठेतील हटाळेर नाका ते भोई आळी नाका या मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास एक इसम बनावट नोटांचा वापर करून खरेदी करत असल्याचे समोर आले. खऱ्या चलनी नोटा असल्याचा भास निर्माण करून त्याने बाजारपेठेतील विविध दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण धर्माजी पाटील याला ताब्यात घेतले. तो पेण येथील गोळीबार मैदान-फणसडोंगरी परिसरात राहत असून मूळचा पेण-दादर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये मूल्याच्या तब्बल ४१ बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी आरोपीला २४ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. याबाबत पाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने या बनावट नोटा कुठून मिळवल्या, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या नोटा बाजारपेठेत किती प्रमाणात चलनात आणल्या गेल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. दरम्यान, बाजारपेठेत बनावट नोटा फिरत असल्याचे उघड झाल्याने व्यापाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या मोठ्या मूल्याच्या नोटांची तपासणी करूनच व्यवहार करावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.