पनवेल : करंजाडे परिसरात प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून लूट करणाऱ्या ऑटो रिक्षाचालकाला ४८ तासांच्या आत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून जबरी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संगिता सोमनाथ भोईर (रा. पनवेल) या ऑटो रिक्षाने घरी जात असताना करंजाडे सेक्टर आर/०४ मधील सत्य ट्रायंडंट बिल्डिंगजवळील सर्विस रोडवर रिक्षाचालकाने ‘रिक्षा बंद पडली’ असे सांगून वाहन थांबवले. त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्यावर, छातीवर व पायावर धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले आणि सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. घटनेनंतर जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले.
तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सहा. पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. ऑटो रिक्षाच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक मिळाल्यानंतर संशयितांचा तपास करत अक्षय एकनाथ बागडे (वय २७, रा. करंजाडे) याला अटक करण्यात आली. कर्जफेडीसाठी पैसे उभारण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली आरोपीने दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करीत आहेत.