न्याय हक्कासाठी शेकडो संतप्त आदिवासी पेण प्रांत कार्यालयावर धडकले; न्याय न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार 

Adicasi Andolan Nivedan

पेण :

शासनाने मंजूर केलेल्या विविध विकास योजनांपासून पेण तालुक्यातील आदिवासींना वंचित ठेवणाऱ्या रा.जि.प.बांधकाम उविभाग पेण व ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून  विकास योजना राबवाव्यात यासह ईतर मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात पेण तालुक्यातील शेकडो संतप्त आदिवासींनी पेण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने आदिवासी बांधव संतप्त झाले. आपल्याला न्याय न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 
यावेळी बैठकीला प्रांताधिकारी प्रवीण पवार, पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती लता मोहिते, पेण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाचपोर, पेण तहसीलदार सचिन शेजाळ व मोर्चाचे नेतृत्वकर्ते सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, किशोर पाटील, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुनिल वाघमारे यांच्यासह ९ आदिवासी वाड्यांतील जितेंद्र वाघमारे, विशाल पवार, नर्मदा वाघे, काळया कडू, रामा खाकर, नरेश कडू, सविता पवार, महादेव शिद,रामदास पवार, धनाजी वाघे उपस्थित होते.
कठोर कारवाईची मागणी
 जानेवारी २०२४ रोजी आदिवासी वाड्यांना जोडणारे रस्ते मंजूर करण्यात आले होते. त्या संदर्भात वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. दहा महिन्यानंतरही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.  
झालेल्या बैठकीतील निर्णय 
  •  उंबरमाल, खैरासवाडी येथील आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांच्या विकास निधीमध्ये झालेल्या गैर कामाची चौकशी करण्यात येईल.
  •  तांबडी येथील सभागृह खैरासवाडी वडमालवाडी, माळवाडी, काजूवाडी या वाड्यांच्या रस्ते उंबरमाळ येथील शाळा इमारत दुरुस्ती चे प्रस्ताव तात्काळ करण्यात येईल असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले. 
  •  तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आदिवासींच्या प्रलंबित जातीच्या दाखल्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले.
  •  खैरासवाडी शेजारी असलेल्या दगड खाणी बाबत आदिवासींना होत असलेल्या समस्यांसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करण्यास पाठविले जाईल असे सांगितले. 
  •  प्रांत अधिकारी प्रविण पवार यांनी खैरासवाडी, काजूवाडी, उंबरमाल या आदिवासी वाड्यांना १५ डिसेंबर २०२४ रोजी भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी करण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *