नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर जप्त करताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एक पिस्तूलही ताब्यात घेतले. ही कारवाई झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून चालक राजेंद्र निकम याला अटक करण्यात आली आहे. संबंधित वाहन MH 03 AH 7863 अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.
वाहन क्रमांकाच्या पडताळणीदरम्यान मूळ वाहनमालकाने “ही गाडी माझी नसून अज्ञात व्यक्ती माझ्या नंबर प्लेटचा वापर करत आहे,” असे सांगितल्यावर पोलिसांना संशय आला. गाडीची पाहणी केली असता समोरील दरवाजा अर्धवट उघडा आढळला आणि आतून पिस्तूल शस्त्र निदर्शनास आले. तसंच ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर कोर्ट चेकरमध्ये तपास केला असता अटक केलेल्या राजेंद्र निकम यांच्या विरोधात मुंबई विभागात विविध गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक जीवन शेरखाने तसेच येळे, मुलाणी, महेंद्र राजपूत, राकेश घाडगे, वाघमारे आणि पीएन केशव निकम यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. वाहतूक पोलिसांच्या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे गंभीर गुन्हेगारी कृत्य उघडकीस आल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.