सोसायटीच्या चेअरमनकडून २८ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

Pratik gems society
रायगड | अमुकुमार जैन 
पनवेलजवळील कामोठ्यामधील हायप्रोफाइल ‘प्रतीक जेम्स’ सोसायटीत 16 सप्टेंबरला झालेल्या 28 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाचा अखेर कामोठे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी कोणत्या बाहेरील चोरट्यांनी नाही तर सोसायटीच्या चेअरमन मोनिका दिघे यांनीच केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिघे यांना अटक केली असून चोरीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, दिघे यांनी म्हसकर यांच्या घरातून दागिने चोरल्यानंतर त्याच कुटुंबासोबत जेवायलाही गेल्या होत्या. गुन्हा लपवण्यासाठी सोसायटीतील सुमारे १० मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज डिलिट केले होते. मात्र स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्यांनीच पोलिसांना दिलेले फुटेज उलट त्यांच्याच विरोधात ठोस पुरावा ठरले. संशय आल्यावर तपास खोलात नेल्यावर फुटेजमध्ये फेरफार केल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला.
याशिवाय तपासात मोनिका दिघे यांनी बँक स्टेटमेंटमधील काही एन्ट्री एडिट करून आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही विश्लेषण आणि आर्थिक चौकशी यावर आधारित पोलिसांनी अखेर गुन्हा पूर्णपणे उघडकीस आणला. या घटनेमुळे सोसायटीमध्ये तसेच परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विश्वासपात्र पदावरील व्यक्तीच गुन्हेगार ठरल्याने रहिवाशांमध्ये संताप व अविश्वासाची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *