अलिबागमध्ये कोट्यावधी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त; आरोपी जेरबंद

अलिबाग | अमुलकुमार जैन
सागरी सुरक्षा आणि किनारपट्टीवरील बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष गस्तीदरम्यान अलिबाग पोलिसांनी चाळमाळा जेट्टी परिसरातून तब्बल ४ कोटी रुपये बाजारमूल्याचे सुमारे चार किलो वजनाचे दुर्मिळ अँबरग्रीस (व्हेल माशाच्या पचनसंस्थेत तयार होणारा पदार्थ) जप्त केले. या प्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी (वय ३३, रा. चाळमाळा, ता. अलिबाग) याला ताब्यात घेऊन आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली किनारपट्टीवरील जेट्टी व लँडिंग पॉइंटवर सुरू असलेल्या विशेष गस्तीदरम्यान २७ जुलै रोजी पहाटे चाळमाळा जेट्टी येथे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ॲक्टिव्हा (एमएच-०६ बीझेड-६३४१) चालकाची तपासणी करण्यात आली. वाहनाच्या डिक्कीत एका कापडी पिशवीत सुमारे चार किलो वजनाचे अँबरग्रीस आढळून आले. या पदार्थाची अंदाजे किंमत ४ कोटी रुपये असून वाहनासह एकूण ४ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत अँबरग्रीस बाळगणे, वाहतूक करणे किंवा त्याची विक्री करणे हा गंभीर गुन्हा असल्याने पंचनामा करून आरोपी व जप्त मुद्देमाल अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अँबरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत नैसर्गिकरित्या तयार होणारा अत्यंत दुर्मिळ, मेणासारखा पदार्थ असून समुद्रात दीर्घकाळ तरंगल्यानंतर त्याला विशिष्ट सुगंध प्राप्त होतो. महागड्या परफ्यूममध्ये ‘फिक्सेटिव्ह’ म्हणून तसेच काही पारंपरिक औषधे, अगरबत्त्या व सुगंधी उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला “फ्लोटिंग गोल्ड” म्हणून ओळखले जाते. या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार अजित देशमुख, नितेश वरसोलकर आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अँबरग्रीससारखा पदार्थ समुद्रकिनारी अथवा अन्यत्र आढळल्यास तो स्वतःजवळ न ठेवता तात्काळ वन विभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन अलिबाग पोलिसांनी नागरिकांना केले आहे.