घराणेशाहीच्या टीकेला सुनील तटकरे यांचे जशास तसे उत्तर; व्यक्तिगत नुकसान केल्याचे एक उदाहरण दाखवा, मी निवृत्त होईन”

अलिबाग | अमुलकुमार जैन
रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या घराणेशाहीच्या आरोपाला तटकरे यांनी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकारणात मतभेद आणि वादविवाद होणे स्वाभाविक आहे; मात्र आपण कधीही व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाचे नुकसान केले नाही, असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला. तसेच मी कुणाचे व्यक्तिगत नुकसान केल्याचे दाखवा मी मी राजकारणातून निवृत्त होईन असे आव्हानच सुनील तटकरे यांनी दिले.
रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, “माझ्या हातात पूर्ण सत्ता असतानाही मी कोणाचे व्यक्तिगत नुकसान केले नाही. मी कोणाबद्दल अवक्षेपाचे शब्द बोललो, हे कोणी दाखवावे. माझ्यावर टोकाची टीका केली गेली, तरी मी कोणाबद्दल व्यक्तिगत बोललो नाही.”
राजकारणात विरोधकांना उत्तर देताना आपण राजकीय भाषेचा वापर केला असून, कोणत्याही वेळी व्यक्तिगत पातळी सोडली नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. “राजकारणामध्ये मी शेळक्या शब्दात बोललो? राजकीय शब्दात उत्तरे दिली आहेत. अलिबागमध्येही अनेक वेळा उत्तरे दिली. मात्र ती राजकीय शब्दांत दिली, स्तर सोडून नाही,” असे तटकरे म्हणाले. रामदास कदम यांनी घराणेशाहीचा आरोप करावा म्हणजे ते आणखीनच असे म्हणत तटकरे यांनी स्मित हास्य केले. या आरोपांचे कारण त्यांनाच माहिती असल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या टीकेवरही सवाल उपस्थित केला.
राजकारणात एखाद्याला निवडून आणणे किंवा एखाद्याचा पराभव करणे हा राजकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राजकीय विरोध हा व्यक्तिगत वैर नसतो, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, “राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणणे, एखाद्याला पराभूत करणे किंवा आम्हाला पराभूत करणे अथवा आम्हाला निवडून आणणे हा राजकारणाचा एक भाग आहे. त्यामध्ये कोणाला वेगवेगळे मतमतांतर करण्याची गरज नाही.”
आपल्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांशी राजकीय संघर्ष झाला असला तरी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा उपजीविकेवर परिणाम होईल, अशा प्रकारचे कोणतेही कृत्य आपण केले नसल्याचे तटकरे यांनी ठामपणे सांगितले. “माझ्या विरोधात काम केला म्हणून त्याच्या व्यक्तिगत पोटावर नुकसान केलंय, असं एक उदाहरण या जिल्ह्यात दाखवा. मी निवृत्त होईन. माझ्या स्वभावात ते नाही,” असे आव्हानच खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार आली आहे. रामदास कदम यांच्या घराणेशाहीच्या आरोपाला तटकरे यांनी राजकीय भूमिकेतून उत्तर देताना व्यक्तिगत टीका टाळली आणि आपल्या राजकीय कारकिर्दीतील कार्यपद्धतीचा दाखला दिला.
आता तटकरे यांच्या या वक्तव्यावर रामदास कदम यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
——————————————
पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने सुरू झालेल्या राजकीय चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटले असतील, तर त्यामागे कौटुंबिक नाते असू शकते. त्यात नवल वाटण्यासारखे काय आहे?” असा सवाल तटकरे यांनी विरोधकांना केला. शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत तटकरे म्हणाले की, देशाच्या राजकारणात त्यांनी सहा दशके महत्त्वाचे योगदान दिले आहे. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे “साहेब हे साहेबच आहेत,” असे म्हणत तटकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला