मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्यात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. पुणे लेनवर झालेल्या या अपघातात एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर एकामागोमाग एक अशी चार वाहने अपघातग्रस्त झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील पुणे लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले.