Uran : निर्जन इमारती बनताहेत नशेबाजांचे अड्डे; चौघांवर गुन्हा दाखल

उरण | विठ्ठल ममताबादे
उरण शहरात न्यायालयासमोर असलेल्या अलिबाग वन विभागाच्या वापरात नसलेल्या पडक्या इमारतीत गांजा सेवन करणाऱ्या चौघा तरुणांना उरण पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याने शहरातील वाढत्या नशेखोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कारवाईमुळे निर्जन व पडक्या इमारती नशेबाजांचे सुरक्षित अड्डे बनत असल्याची गंभीर बाब समोर आली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
३ मे २०२६ रोजी दुपारी उरण न्यायालयासमोर असलेल्या जुन्या व पडझड झालेल्या इमारतीत काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती उरण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान चार तरुण गांजा सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी सौरभ बिस्वनाथ प्रामाणीक (३०), हर्षल विनायक भोईर (२४), हेमंत बबन कोळी (३२) आणि जुगल लक्ष्मण पाटील (२३) या चौघांविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३०/२०२६ अन्वये कलम ८(क) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) नुसार नोटीस देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली.
उरण शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या सेवनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः केगाव, पिरवाड, दांडा परिसर तसेच पडक्या सरकारी इमारती, बंद गोडाऊन आणि निर्जन जागा यांचा वापर नशेखोरांकडून होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वीही गांजा सेवनाच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती.
न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरात दिवसाढवळ्या नशा केली जात असल्याने कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. पडक्या सरकारी इमारतींना संरक्षण द्यावे, त्यांची डागडुजी करावी किंवा कुलूपबंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच शाळा, महाविद्यालय परिसर, बस स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिस गस्त वाढवून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही जोर धरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढती नशेखोरी ही केवळ कायद्याची समस्या नसून सामाजिक चिंतेचा विषय आहे. युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन, जनजागृती मोहीम आणि पालक-शिक्षण संस्था-पोलिस यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेमुळे उरणमधील वाढत्या नशेखोरीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.