रसायनीत देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; अल्पवयीन मुलीसह तिघींची सुटका

रायगड | अमुलकुमार जैन
 रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांभार्ली परिसरात सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री धडक कारवाई करत अल्पवयीन मुलीसह तिघींची सुटका केली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या नीता राहुल गायकवाड (वय ३६) हिला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीता गायकवाड ही चांभार्ली येथील एका इमारतीत भाडेतत्त्वावर राहत होती. नोकरी व पैशांचे आमिष दाखवून ती अल्पवयीन व तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती. त्यानंतर संबंधित मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलून त्यांच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला.
या कारवाईत पूजा (२३), राणी (२८) आणि मोनाली (वय १६ वर्षे ५ महिने) या पीडित मुलींची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. तिन्ही पीडित मुलींना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
खालापूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनम हरी शेळके यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास रसायनी पोलिस करत आहेत.