शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये सहा दशकानंतर मोठा राजकीय बदल घडला असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
शिवसेना (शिंदे गट) शहापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भाग्यतता नंदन पाटील यांची सभापतीपदी, तर आवास पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या प्रिया प्रमोद भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाग्यतता नंदन पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी प्रिया प्रमोद भगत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत या दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार पुढे आला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी भाग्यतता पाटील आणि उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.
सध्या अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे १२ सदस्य आहेत, तर शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असून शेकापच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नवनिर्वाचित सभापती भाग्यतता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेत शिवसेना गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्यासह अनेक उपस्थीत कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, अलिबाग पंचायत समितीवर तब्बल सहा दशकानंतर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.