रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया पाशिलकर, उपसभापतीपदी संजय मांडलूसकर बिनविरोध

रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया पाशिलकर
कोलाड | श्याम लोखंडे 
रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया विनोद पाशिलकर तर उपसभापतीपदी संजय संभाजी मांडलूसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज दि. ११ मार्च रोजी पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, कार्याध्यक्ष समीर शेडगे, रोहा-अष्टमी नगरपरिषद नगराध्यक्षा वनश्री शेडगे, सुरेश मगर, किसन मोरे, जगन्नाथ धनावडे, वर्षा हेमंत देशमुख, अरुणा जानू हंबीर, माजी सभापती बाबुराव बामणे, अनिल भगत, जयवंत मुंडे, अनंत देशमुख, राजेंद्र पोकळे, नरेश पाटील, रोहिदास पाशिलकर, मनिषा पाटील, नंदकुमार म्हात्रे, संतोष भोईर, राकेश शिंदे, अनिल भगत, शेणवई सरपंच प्रगती देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना रोहा तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, रोहा पंचायत समितीची निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, शिवसेनेचा १ आणि उबाठा गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. नवीन सभापती व उपसभापती यांच्या निवडीमुळे रोहा पंचायत समितीच्या कारभाराला आता नवे नेतृत्व लाभले असून तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.