देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण होत असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खुटलं ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडीतील ग्रामस्थ मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी साधा पायी चालण्याजोगा रस्ताही नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना दररोज खडतर प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
खुटलं ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडी परिसरात सुमारे ३० ते ४० कुटुंबे वास्तव्यास आहेत. मागील सुमारे ४० वर्षांपासून नागरिक या वाड्यांमध्ये राहत असतानाही त्यांच्या वाड्यापर्यंत जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता झालेला नाही. मुख्य रस्त्यापासून वाडीकडे जाणारी वाटच नागरिकांसाठी एकमेव आधार आहे. मात्र पावसाळ्यात या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओढ्यासारखा वाहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायक परिस्थितीतून वाट काढावी लागते. शाळकरी मुलांना दररोज या पायवाटेवरून प्रवास करावा लागतो. पावसाचा जोर वाढला की पालकांचीही चिंता वाढते. एखादा विद्यार्थी घसरून पडण्याची किंवा पाण्याच्या प्रवाहात अडचणीत येण्याची भीती असते. त्यामुळे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवासही धोकादायक बनला आहे.
केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर आजारी, ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याची वेळ आल्यास वाहन वाडीत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे रुग्णाला पायी मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होते. रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. निवेदने देऊन तसेच वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
——————————–
“स्वातंत्र्याला ८० वर्षे झाली, तरी आमच्या वाडीत जाण्यासाठी रस्ता नाही. आम्हाला मोठ्या सुविधा नकोत; किमान पायी सुरक्षितपणे चालता येईल असा रस्ता तरी करून द्यावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आता तरी प्रशासनाने या वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा खडतर प्रवास थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.