उकरुळ शाळेला शैक्षणिक साहित्याची मदत

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर 
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उकरुळला सामाजिक संस्था आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली. शनिवारी स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात ही मदत सुपूर्द केली. तसेच, गावात इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीला सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 
जिल्हा परिषद शाळांची घसरती पट संख्या आणि बिकट अवस्था यावर उपाय म्हणून सामाजिक संस्था मदत देत असतात. ग्रामीण भागातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असली तरी सामाजिक संस्था आणि माजी विद्यार्थी नेहमीच साहाय्य करीत असतात. जिल्हा परिषद शाळा उकरुळमध्येही सामाजिक संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मदत देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्पीकर देण्यात आला, तर पुण्यातील सामाजिक संस्थेच्या वतीने एलईडी टीव्ही देण्यात आला आहे.
तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश मते यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला बॅगसह शैक्षणिक साहित्य देण्यात आले. दरम्यान गावामध्ये इयत्ता दहावीला प्रथम आलेली विद्यार्थीनी यशश्री दयानंद सॊमणे हिच्या हस्ते शाळेमध्ये तर बारावीला प्रथम आलेला विद्यार्थी अमेय सुरेश श्रीखंडे याच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी, सरपंच नीलिमा थोरवे यांसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.