सायबर फसवणुकीच्या पैशांचे ‘म्युल अकाऊंट’ रॅकेट उघड; पेण, पोयनाडमध्ये स्वतंत्र कारवाई, चौघांविरुद्ध गंभीर गुन्हे

 

रायगड- अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल बँक अकाऊंट’च्या जाळ्यावर पोलीसांनी मोठा प्रहार केला असून, पेण आणि पोयनाड पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांद्वारे स्वीकारून पुढे वर्ग करण्यासाठी या खात्यांचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही कारवायांमुळे सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक साखळीचा महत्त्वाचा दुवा उघडकीस आला असून, रायगड पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे.
पेण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सागर संदीप खांडसकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यश पांडुरंग गायकवाड आणि इब्राहिम बशीर शाह यांनी ‘Techwave Mobile Send Accessories’ या नावाने व्यवसायाच्या आड बँक खाते उघडून २०२५ ते २०२६ या कालावधीत सायबर फसवणुकीतून आलेली मोठी रक्कम स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग करून सायबर गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, तोतयेगिरी, कट रचणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यानेही अशाच प्रकारच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटवर कारवाई केली आहे. मौजे पोयनाड येथील तेजस मनोज धुळे आणि विशाल पाटील यांनी संगनमत करून आयडीबीआय बँकेत खाते उघडले. सन २०२४ ते जून २०२६ या कालावधीत या खात्याचा वापर विविध सायबर गुन्ह्यांमधून आलेल्या पैशांच्या व्यवहारासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रसाद अनंत पाटील यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा क्रमांक ८४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१७(५), ६१(२) व ४९ अन्वये नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार मंगेश धुपकर पोलीस उपनिरीक्षक विजय सरके करीत आहेत.
सायबर गुन्ह्यांमध्ये ‘म्युल अकाऊंट’चा वापर करून फसवणुकीची रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवली जाते. त्यामुळे मूळ गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर पेण आणि पोयनाड पोलिसांनी केलेल्या कारवाया महत्त्वाच्या मानल्या जात असून, संबंधित बँक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.