शिमग्याची धूम, हजारो होळ्यांची झळाळी; पर्यावरणपूरक संदेशात उजळला रायगड जिल्हा

रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यात यंदाचा शिमगोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. होळी पौर्णिमेच्या तेजस्वी रात्री जिल्हाभर तब्बल चार हजारांहून अधिक ठिकाणी होळी दहन करण्यात आले. सार्वजनिक आणि खाजगी अशा मिळून सुमारे ४,०८० होळ्यांनी संपूर्ण जिल्हा उजळून निघाला. गावागावांत पारंपरिक विधी, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीभावाच्या वातावरणात शिमग्याचा जल्लोष रंगला.
कोकणात शिमगोत्सवाला गणेशोत्सवाइतकेच महत्त्व आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि महाडसह संपूर्ण जिल्ह्यात उत्सवाची धूम पाहायला मिळाली. विशेषतः दक्षिण रायगडमध्ये तब्बल १५ दिवस शिमगोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते. काही गावांत पेंढ्याची भव्य होळी रचून ती पारंपरिक पद्धतीने पेटवली जाते. महाड परिसरातील काही ठिकाणी ५० फुटांपर्यंत उंच होळी उभारण्याची परंपरा असून, जळती लाकडे फेकण्याचा थरारक विधीही पार पडला.
किनारपट्टीवरील कोळीवाड्यांत शिमग्याचा रंग काही औरच होता. पारंपरिक वेशभूषा, लोकगीतांचा ताल आणि सामूहिक नृत्यांनी वातावरण भारावून गेले. महिलांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत होळीभोवती फेऱ्या मारत आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन आणि सामुदायिक मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, सण सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील भागांत विशेष लक्ष ठेवत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख करण्यात आली. प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले होते. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या होत्या. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
यंदा पर्यावरणपूरक होळीचा संदेश ठळकपणे देण्यात आला. ‘आपला सण, निसर्गाचे जतन’ हा मंत्र जपत प्लास्टिक, टायर किंवा इतर घातक वस्तू न जाळता केवळ लाकूड आणि गोवऱ्यांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक पर्यावरणस्नेही संस्थांनी जनजागृती मोहीम राबवून वायू प्रदूषण टाळण्यावर भर दिला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर आणि वृक्षतोड टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.
एकंदरीत, परंपरा, उत्साह आणि पर्यावरणाची जाणीव यांचा सुंदर संगम साधत रायगड जिल्ह्यातील शिमगोत्सव जल्लोषात आणि शांततेत पार पडला. हजारो होळ्यांच्या तेजस्वी ज्वाळांनी उजळलेल्या या रात्रीने एकात्मतेचा आणि आनंदाचा संदेश दिला.