पेणमध्ये ‘पोलीस’ असल्याचे भासवून सोन्याची फसवणूक; ९९ हजारांचा ऐवज लंपास

PEN न्यूज ऑनलाइन टीम |

पेण पोलीस ठाणे हद्दीत सोमवार दि. ०२/०३/२०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे म्हाडा कॉलनी परिसरात धक्कादायक फसवणुकीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, एयू स्मॉल फायनान्स बँकेसमोरील रस्त्यावरून स्कुटरवरून घरी परतत असताना फिर्यादी (रा. विवेक बिल्डिंग, आमराई म्हाडा कॉलनी, पेण) यांना दोन अज्ञात इसमांनी अडवले. नंबर नसलेल्या स्कुटरवरून आलेल्या या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत फिर्यादींना थांबवले. “सोनं घालून का फिरता, चोरी होतात हे माहित नाही का?” असे सांगून त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. गळ्यातील सोन्याची चैन व हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. फिर्यादी डिक्कीत दागिने ठेवत असताना दोघांनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने अंदाजे ९९ हजार रुपयांच्या सोन्याची फसवणूक करून पळ काढला.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण करीत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावट पोलीसांकडून सावध राहावे, असे आवाहन पेण पोलिसांकडून करण्यात आले आहे.