रायगडच्या न्यू बॉम्बे कराटे क्लब (एनबीकेसी)च्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय स्पर्धेत कराटेपटू फॉस्टिना फर्नांडो हिने सुवर्णपदक पटकावत दक्षिण आशिया कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच अनात्रा समीत करांडे हिने राज्यस्तरीय सुवर्णपदकानंतर राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक जिंकत दमदार कामगिरीची पुनरावृत्ती केली.
या यशामागे प्रशिक्षक योगेश कांबळी आणि बिपीन राय यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. क्लबचे अध्यक्ष रोहन यादव यांनी सर्व विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. रायगडातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी क्लब सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.