अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात
अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावाच्या हद्दीत गुरुवारी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर गणेश पवार (वय २२, रा. पाटणसई आदिवासीवाडी, ता. रोहा) हा त्याची मैत्रीण वृशाली अंकुश वाघमारे (वय १८, रा. ताडवाडी आदिवासीवाडी, ता. मुरुड) हिच्यासह दुचाकीवरून अलिबाग-रोहा मार्गाने प्रवास करत होता. सुडकोली गावाजवळील धोकादायक वळणावर आल्यानंतर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्याखालील ओढ्यात कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, वृशाली वाघमारे हिच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ईश्वर पवार याच्या डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली परिसरातील वळणे धोकादायक असल्याने येथे यापूर्वीही अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.