मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार आणि एल अँड टी कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका नागरिकांना बसला. आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांढवे खुर्द येथील सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळी ८:३० वाजता पोलादपूरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत होती. मात्र, सर्विस रोडवरील पाणी साचलेल्या भागात बस अडकली. चालकाने प्रसंगावधान राखत बस त्या ठिकाणीच थांबवली, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम आजही परिपूर्ण नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे हा महामार्ग पूर्ण करण्याच्या घाईमध्ये सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. उड्डाणपुलावरून पावसाचे पाणी पाईप द्वारे सर्विस रस्त्यांवर आणून सर्विस रस्त्यांच्या गटारामध्ये टाकणे अपेक्षित होते मात्र हे पाईप वरच्यावर सोडून देण्यात आले आहेत यामुळे सर्विस रोडवर पाणीच पाणी साचून राहत आहे. सर्विस रोडवर येणारे पाणी देखिल योग्य पद्धतीत निचरा व्यवस्था नसल्याने साचून राहत आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील ज्या गावांना सर्विस रोड दिलेले आहेत त्या सर्वच रस्त्यांवर पाणी तुंबून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची गटार व्यवस्था आणि पाण्याची निचरा करणारी यंत्रणा ही अनयोजित पद्धतीने केली गेली असल्याने सातत्याने या परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.