फिलिपिन्स सरकार कडून भारतीय शास्त्रज्ञ व प्रख्यात प्राध्यापक डॉ. प्रतिक मुणगेकर यांचा गौरव

वेळास आगर | संतोष शिलकर
संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत फिलिपिन्समधील बालांगा शहर (प्रांत: बतान) येथील शहर प्रशासनाने भारतीय शास्त्रज्ञ व प्रख्यात प्राध्यापक डॉ.प्रतिक राजन मुणगेकर यांना Certificate of Commendation प्रदान करून सन्मानित केले.हा सन्मान बालांगा शहराच्या महापौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ.प्रतिक राजन मुणगेकर रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास या लहान गावात जन्म झाला असून त्याचं शिक्षण लालबाग आणि डोंबिवली येथे झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून संशोधन,उच्च शिक्षण,नवोपक्रम, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आणि युवा संशोधक घडविण्याच्या क्षेत्रात डॉ. मुणगेकर यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे भारतासह विविध देशांतील शैक्षणिक संस्था, संशोधक आणि विद्यार्थ्यांना संशोधन व नवोपक्रमासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
डॉ. मुणगेकर हे संचालक (संशोधन, नवोपक्रम व आंतरराष्ट्रीयीकरण) म्हणून कार्यरत असून, देश-विदेशातील अनेक विद्यापीठांशी संशोधन व शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले असून संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोपक्रम आणि शाश्वत विकास या विषयांवर विशेष कार्य केले आहे.
फिलिपिन्स सरकारकडून मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे भारताच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचा जागतिक स्तरावरील गौरव अधिक उंचावला असून विविध स्तरांतून डॉ. प्रतिक मुणगेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
————————————-
 हा सन्मान केवळ माझा नसून भारतातील प्रत्येक शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्याचा आहे. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. भविष्यातही संशोधन, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.
..डॉ. प्रतिक मुणगेकर म्हणाले