घरगुती कारणावरून एका तरुणीने पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडाच्या खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अत्यंत दुर्गम आणि धोकादायक परिसरात शोधमोहीम राबवत पनवेल तालुका पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित तरुणीचा मृतदेह बाहेर काढला.
प्राप्त महितीनुसार, पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोयंजे बीटच्या अमलदारांना एका महिलेने माची प्रबळगडाच्या टोकावरून उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार मिस्त्री, पोलीस शिपाई जाधव व पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक पाहणीत घटनास्थळी कोणतीही महिला दिसून आली नाही. माहिती देणाऱ्या व्यक्तीचा फोन बंद असल्याने अडचण निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः माची प्रबळगड चढून परिसरात चौकशी सुरू केली. स्थानिक वस्तीतील नागरिकांकडून एका महिलेची दरीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील युवकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली.
शोधादरम्यान दरीत एका महिलेचा संशयित आकृती आढळून आली. दोरीच्या साहाय्याने आणि अत्यंत धोकादायक पायवाटेने खाली उतरून पोलिसांनी महिलेपर्यंत पोहोचत तिला वर आणले. जखमी अवस्थेत आढळलेल्या महिलेची कोणतीही हालचाल नसल्याने तिला साडीत गुंडाळून खांद्यावर घेत गड उतरवण्यात आले आणि तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
मृत तरुणीची ओळख प्रीती संजू सिंग – २८ वर्षे (रा. सेक्टर १२, कोपरखैरणे, नवी मुंबई, मुळ – बिहार ) ती एका शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तसेच येत्या ३ मार्च रोजी तीचे लग्न होणार होते. घरगुती कारणामुळे रागाच्या भरात तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, माची प्रबळगड परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. घनदाट जंगल, अरुंद व निसरडी पायवाट, खडकात कोरलेल्या उंच पायर्या आणि कोणतेही संरक्षण रेलिंग नसल्याने येथे पाय घसरण्याचा मोठा धोका असतो. सुमारे २३०० मीटर उंचीच्या गडावरून सुमारे १२०० मीटर खोल दरीत संबंधित महिला पडल्याचे आढळले. या कठीण भौगोलिक परिस्थितीत पोलिसांनी दाखवलेले धैर्य आणि स्थानिकांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले आहे.