महाड तालुक्यात पोलीस बंदोबस्तात वाढ

महाड | मिलिंद माने 

येत्या ७ फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आले असून यासाठी ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार ,१७ अधिकारी आणि दोन स्पेशल फोर्स तैनात ठेवण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी ५ गटांमध्ये तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी निवडणूक होत आहे. काही दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या दिवशी महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन गटांमध्ये राडा झाला होता. तीच पुनरावृत्ती या निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील दासगाव, खर्डी आणि बिरवाडी बाजारपेठ या तीन ठिकाणी पोलिसांमार्फत संचलन करण्यात आले.

महाड तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट असून पंचायत समितीचे १० गण आहेत तर २०३ मतदान केंद्र आहेत. या अंतर्गत महाड शहर, महाड तालुका आणि एमआयडीसी असे तीन पोलीस ठाणे आहेत. होणाऱ्या निवडणुकी साठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हा बंदोबस्त ६ आणि ७ फेब्रुवारी असा दोन दिवस राहणार आहे.

या बंदोबस्तासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत १०५ होमगार्ड ६५ पोलीस अंमलदार, शहर पोलीस ठाणे अंतर्गत २१२ होमगार्ड, १८८ पोलीस अंमलदार आणि १२ अधिकारी, तालुका पोलीस ठाणे अंतर्गत १४१ होमगार्ड, ७० पोलीस अंमलदार आणि ५ अधिकारी असे एकूण तीन पोलीस ठाणे अंतर्गत ४५८ होमगार्ड, ३२३ पोलीस अंमलदार आणि १७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.त्याच बरोबर एक प्लाटून त्यामध्ये १ अधिकारी आणि २३ पोलीस अमलदार असून १ सेक्शन मध्ये ८ पोलीस अमलदार तैनात राहणार आहेत.

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या राड्या प्रकरणाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागात होऊ नये यासाठी पोलिसांबरोबरच गावपातळीवरील पोलीस पाटलांना देखील सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत