सैनिक फेडरेशनच्या ‘माजी सैनिक संवाद’ कार्यक्रमामध्ये आ.प्रवीण दरेकर यांच्यासोबत सैनिक परिवाराचा संवाद

पोलादपूर | शैलेश पालकर 

शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये सैनिक फेडरेशन तालुका पोलादपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना कॅबिनेट दर्जाचे आ.प्रवीण दरेकर यांनी सैनिक परिवारासोबत संवाद साधला.

प्रारंभी महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष सुभेदार सुभाष दरेकर यांनी प्रस्तावना करताना पोलादपूर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहीद स्मारक उभारावे, तसेच महाड तालुक्यात बहुउद्देशीय सैनिक भवन उभारावे अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच, तालुक्यातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा व प्रशिक्षण केंद्र, एनडीए आणि सीडीएस मार्गदर्शन अभ्यासिका, युपीएससी व एमपीएससी धर्तीवर क्लासेस तसेच तळागाळातील तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. माजी सैनिकांसाठी सरसकट टोलमाफी तसेच निवृत्ती ओळखपत्राच्या आधारे मंत्रालयात मोफत प्रवेश मिळावा अशा मागण्या मांडण्यात आल्या. आ.दरेकर यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून या विषयांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शेवटी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी,माजी सैनिकांनी देशासाठी अमूल्य सेवा केली आहे. आपली सामाजिक सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू,अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक  प्रकाश दरेकर, पोलादपूर तालुका माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव उतेकर, सचिव परशुराम दरेकर, कॅप्टन चव्हाण, कॅप्टन विष्णू सावंत, कॅप्टन यशवंत पार्टे,पांडुरंग जाधव, उदय मोरे तसेच शहीद जवानपत्नी सुनीता बांदल यांच्यासह अनेक माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.