पनवेलमध्ये मोबाईल चोर अटकेत; तीन गुन्हे उघड, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल | संजय कदम 
पनवेल परिसरातील वरचे ओवळे, सेक्टर १ येथील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या मोबाईल चोरीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी जगदीश गुरुनाथ वाघे (वय ३५) याला अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडून मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास प्लॉट क्रमांक २४९ समोरील बांधकामाच्या ठिकाणी ही चोरी झाली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पठाण आणि त्यांच्या पथकाने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि ७० हजार रुपये किमतीची होंडा डिओ स्कूटर जप्त करण्यात आली.
या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.