उरण तालुक्यातील जसखार गावातील ग्रामसुधारणा मंडळाच्या सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकत्र आले, तरी विद्यमान सदस्य राकेश तांडेल यांनी एकट्याने त्यांना जोरदार टक्कर दिली. सेक्रेटरी पदाचे विजयी उमेदवार सूरज कडू यांना ६५ मते, तर राकेश तांडेल यांना ५४ मते मिळाली. तांत्रिक कारणामुळे बाद ठरलेल्या एका मताचाही विचार करता तांडेल यांना ५५ मते मिळाल्याचा दावा करण्यात आला. अवघ्या १० मतांच्या फरकाने झालेल्या या निकालामुळे जसखारच्या राजकीय वर्तुळात राकेश तांडेल यांच्या लढतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जसखार गावातील यात्रा, पालखी सोहळा आणि इतर सार्वजनिक उत्सवांची जबाबदारी कोण सांभाळणार, यासाठी ग्रामसुधारणा मंडळाची ही निवडणूक पार पडली. गेल्या १५ वर्षांपासून गावातील राजकारणात प्रभाव राखणारे राकेश तांडेल स्वतः सेक्रेटरी पदासाठी मैदानात उतरल्याने निवडणुकीला प्रतिष्ठेचे स्वरूप आले. भाजपचे आमदार महेशशेठ बालदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते व पदाधिकारी अशा विविध राजकीय गटांनी एकत्र येत निवडणूक लढविल्याचे चित्र होते. दुसरीकडे, राकेश तांडेल यांनी स्वतंत्रपणे लढत दिली. त्यांच्या प्रचारातील शांत भूमिकेमुळे विरोधकांचा विजय सोपा असल्याची चर्चा रंगली होती.
रविवारी सायंकाळी झालेल्या मतमोजणीत मात्र चुरशीचे चित्र समोर आले. सूरज कडू यांनी ६५ मते मिळवत विजय मिळवला, तर राकेश तांडेल यांना ५४ वैध मते मिळाली. मतमोजणी संपल्यानंतर आलेल्या त्यांच्या मित्राचे मत ग्राह्य धरले गेले नसल्याने तांडेल यांच्या समर्थकांकडून एकूण ५५ मतांचा उल्लेख करण्यात आला. निकालानंतर राकेश तांडेल यांनी विजयी उमेदवार सूरज कडू यांना आनंदाने मिठी मारून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार आणि त्यांचे मित्र रणजीत पाटील यांनाही त्यांनी शुभेच्छा देत गावातील सर्व उत्सव गुण्यागोविंदाने पार पाडण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या निवडणुकीनंतर २०२७ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतही राकेश तांडेल यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले. पुढील निवडणूक न लढविण्याचे संकेत देतानाच, सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी सर्वपक्षीय एकजूट घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि जसखारमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावातील उत्सव कमिटीचे अध्यक्ष रविशेठ ठाकूर यांनी सरपंचपदाची निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याची तयारीही तांडेल यांनी दर्शवली. या संपूर्ण निवडणुकीत सर्वपक्षीय ताकदीसमोर एकट्याने उभे राहून मोठ्या प्रमाणात मते मिळविल्याने राकेश तांडेल यांची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जसखारमध्ये प्रश्न एकच उपस्थित होत आहे—निवडणूक सूरज कडू यांनी जिंकली; पण राजकीय ताकदीची खरी कसोटी कोणाची लागली?