पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुक्यात रेडयांच्या झोंब्यांचे शौकीन मोठया प्रमाणात असून रेडयांच्या झोंब्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून केले जात असतात. या झोंब्यांदरम्यान प्रतिस्पर्धी रेडयांच्या पराभवासाठी मांत्रिक तांत्रिकांमार्फत अंधश्रध्दा पसरविण्याचेही बेकायदेशीर उपक्रम राबविले जातात. मात्र, पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे रेडयांच्या झोंब्यांचे बेकायदेशीररित्या आयोजन केल्याने पोलादपूर पोलीसांनी दोन व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभी महाडकडून रेडयांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यात सुरू झाले. विविध राजकीय व्यक्तींकडूनही रेडयांच्या झोंब्यांसाठी मोठया प्रमाणात अर्थसहाय्य व देणग्या दिल्या गेल्या. गेल्या महिन्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये दोन ठिकाणी रेडयांच्या झोंब्यांचे आयोजन यशस्वी झाल्यानंतर हजारो झोंबी शौकिनांची उपस्थिती दिसून आली. अशाचप्रकारच्या रेडयांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे गुरूवारी सकाळी 8 वाजून 10 मिनीटांनी करण्यात आल्याचे पोलादपूर पोलीस ठाण्याला समजून आले.
यावेळी या रेडयांच्या झोंब्यांचे आयोजन भोगाव खुर्द येथील संदीप शांताराम शेलार आणि अक्षय काशिराम कदम यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच सीआरपीसी 149 च्या नोटीशीचे उल्लंघन करून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960च्या 11(1)(एन)सह भादंवि 188 प्रमाणेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये गुन्हा केल्याने पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांनी फिर्याद दिली. ठाणे अंमलदार पोलीस नाईक महाडीक यांनी दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 4-2024 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक उदय धुमास्कर हे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील रेडयांच्या झोंब्यांच्या आयोजनाचे खासगी वृत्तवाहिन्यांकडून वृत्तांकन इंटरनेटवर प्रसारित होत असून काही कालावधीनंतर त्या प्रसारणाची लिंक नष्ट केली जात आहे. त्याच प्रमाणे प्रतिस्पर्धी रेडयांच्या पराभवासाठी अनेक मांत्रिक तांत्रिक यांच्याकडून अघोरी प्रकार झोंब्यांच्या आयोजनाच्या शेतावर तसेच माळावर केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.